उपासनी महाराज उर्फ काशीनाथ गोविंदराव उपासनी हे महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील साकोरी येथील सद्गुरु व संत होते. श्री. उपासनी महाराज सुरुवातीस एक योगी होते व नंतर शिर्डीच्या साईंबाबांसोबत तीन वर्ष शिष्य म्हणून राहिल्यानंतर त्यांना आत्मप्राप्ती झाली. मेहेर बाबा यांचे गुरू म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. साकोरी येथे महाराजांचे समाधी मंदिर आहे.
उपासनी महाराज यांची मुख्य शिकवण अशी होती :
- कोणाचीही हिंसा करू नका.
- स्वतः कष्ट सहन करून देखील दुसऱ्याच्या उपयोगी पडा.
- आहे त्या स्थितीत समाधानी रहा.
श्रीक्षेत्र साकोरीचे श्रीउपासनी बाबा हे विदेही महात्मा, सिद्धावस्था गाठलेले योगिराज होते. त्यांचे संपूर्ण नाव श्री काशिनाथ गोविंद उपासनी. वेदशास्त्रसंपन्न व ज्योतिषविद्यापारंगत घराण्यात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना परमार्थाची आवड होती. आत्मतत्त्वाचा शोध घेण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला आणि ईश्वरप्राप्तीसाठी गौळवाडी येथील डोंगरातील कपारीत उग्र तपश्र्चर्या केली.
पुढे संतचूडामणी साईबाबांनी बाबांवर पूर्ण कृपा केली. त्यांना खंडोबाच्या मंदिरात बसवून, त्यांच्याकडून कठोर साधना करवून घेतली. श्रीक्षेत्र शिर्डीतल्या खडतर साधनेने त्यांना पूर्णत्व आले. त्यांना सच्चिदानंद अवस्था प्राप्त झाली. त्यांना क्षुधेतृषेची, थंडीवाऱ्याची तमा राहिली नाही. या तपश्चर्येनंतर विदेही झालेली उपासनी बाबा जगदुद्धारार्थ बाहेर पडले. गुरुपदाचे धनी होऊन ते संचार करू लागले, तर लोक त्यांना वेडा समजून दूर हाकलू लागले. डॉ. पिल्ली यांचे बंधू चित्रास्वामी त्यांना खरगपूरला घेऊन गेले आणि तेथे ते त्यांच्या यौगिक सामर्थ्याच्या रूपाने लोकांच्या नजरेला पडले. ओंकारेश्र्वर, उज्जैनी अशी तीर्थक्षेत्र करीत ते श्रीक्षेत्र साकोरीला आले.
श्रीउपासनी बाबा साकोरीला कायमचे स्थिरावले. तेथे झोपडी बांधून तीत राहू लागले. लवकरच त्यांनी ‘कन्याकुमारी स्थाना’ ची निर्मिती केली. झोपडीच्या जागी श्रीदत्त मंदिर उभे राहिले. लाकडी पिंजऱ्यात बंदिस्त होऊन त्यांची आराधना सुरू झाली. पिंजऱ्यात बसून ते प्रवचने करू लागले. त्यांची वाक्गंगा दुथडी भरून वाहू लागली. ‘साई वाक्सुधा’ या नावाने ही अनमोल प्रवचने नंतर प्रकाशित झाली.
श्रीउपासनी बाबांच्या ‘कन्याकुमारी स्थाना’ मुळे त्यांच्यावर टीकेची बरीच झोड उठली. श्रीबाबांना कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. पण कालांतराने श्रीबाबा निर्दोष असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. लवकरच साकोरीची स्मशानभूमी बाबांच्या वास्तव्याने भूवैकुंठ बनली. श्रीउपासनी वाक्सुधा’ हा त्यांचा बृहत् ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. त्यातील त्यांचे नामस्मरणविषयक बोल अत्यंत मधुर असून जीवाचे कल्याण करणारे आहेत. ते असे -
‘भवरोग जाण्यासाठी नामस्मरणाची फार जरूरी आहे. भवरोगच गेला तर सर्वच शारीरिक, मानसिक रोग लयाला जातील. जसे वैद्याचे औषध घेऊन पथ्य सांभाळले नाही तर गुण येत नाही. तसे नुसते नामस्मरण केले व पथ्य सांभाळले नाही तर उपयोग होणार नाही.
नामस्मरण म्हणजे तोंडाने केवळ बडबड नव्हे. स्मरण म्हणजे आठवण. स्मरण करणे ही मनाची क्रिया आहे. म्हणून खरे नामस्मरण केले जात नाही. तुमच्या घरच्या आईवडिलांचे स्मरण करण्यासाठी माळ घ्यावी लागते की काय? त्यांचे नाव घेताच त्यांचे रूप गुणधर्म सर्व एकदम ध्यानात येतात. तसेच राम, कृष्ण वगैरे नावे घेताच त्यांचे सर्व गुणधर्म ध्यानात आले पाहिजेत.’ असे ते नेहमी म्हणत असत.
‘जसे पाण्याची गार घनीभवनाने जडरूप दिसते. पण त्या गारेच्या आत-बाहेर सर्वच पाणी आहे. पाण्याचीच ती बनलेली आहे. तसेच राम, कृष्ण वगैरे कोणत्याही देवतेची अक्षरे किंवा वेदमंत्राची अक्षरे ही आतबाहेर ब्रह्मरूपच आहेत. ‘गायत्रीसारख्या कोणत्याही वेदमंत्राक्षरांचे व रामकृष्णादिक कोणत्याही परमेश्वरी देवता नामाक्षरांचे जपजाप्यादिकांच्यायोगे मनाशी तादात्म्य करणे, हाच खरा नामजप किंवा मंत्रजप.
‘जप करताना काहीवेळा झोप येते. ती येऊ नये म्हणून कोणी तपकीर ओढतात, कोणी बिडी पितात. कोणी डोळ्यांत कापूर घालतात. मात्र जपात खरे प्रेम नसल्यामुळे हे सर्व करावे लागते. निद्राप्रिय अवस्थेत माळ हातात फिरत रहाते, मन मात्र दुसरीकडे असते. अशा जपाचा काहीच उपयोग नाही. जप करताना झोप येऊ लागली तर कष्टाची सेवा करावी. नंतर काही वेळाने पुन: जप करीत बसावे. म्हणजे मन स्थिर होईल.’ असे बाबा सांगत.
‘कोणत्याही इष्टदेवतेच्या नावाचा केवळ जप करण्यापेक्षा त्याची नावे लिहीत जावी. नाम घेत असताना हे हाताने लिहिणे सारखे चालू ठेवावे. मनाने राम, राम म्हणावे व हाताने ते लिहून काढावे. लिहिण्याच्या जागी एकसारखी दृष्टी ठेवल्याशिवाय लिहिले जात नाही. त्यामुळे इकडे तिकडे लक्ष जाणे बंद होते. इतर विषयांवर लक्ष जाणे बंद झाल्याने मन रामनाम घेण्यातच गुंतते. अशा रीतीने एकतानता झाल्यावर देहाविषयीसुद्धा विसर पडतो. अंत:करण एकाग्र होण्याचा हा एक उपाय आहे,’ असे बाबा आपल्या भक्तांना सांगत असत.
जगातील सर्वसुखप्राप्तीसाठी परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाणे आणि त्याचे अनन्य भावाने नामस्मरण करणे अत्यंत जरुरीचे आहे. नामस्मरणाने जन्मोजन्मीचे सर्व दोष नाहिसे होतात. शरीर व मन पवित्र होतात. इहलोकीचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शेवटी नामधारकाला परमेश्वरप्राप्ती होते. म्हणूनच कायम जप-नाम स्मरण करणे योग्य, ही बाबांची शिकवण आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.
Source-Wikipedia
टिप्पणी पोस्ट करा